मुंबई : मुंबई पोलिसांनी छोटा शकीलच्या शूटरला एका हत्येप्रकरणी 25 वर्षांनंतर अटक केली आहे. हा शूटर गेल्या 25 वर्षांपासून फरार होता. याचे नाव लईक अहमद फिदा हुसैन शेख (वय 50) असे आहे. पायधुनी पोलिसांनी 28 जुलै रोजी छोटा शकील टोळीच्या शूटरला ठाणे रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. एका गँगस्टरच्या हत्येचा आरोप या शूटरवर असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
कोणाची हत्या केली होती: शार्प शूटर शेख याने आपल्या साथीदाराच्या मदतीने गँगस्टर मुन्ना धारी याची 2 एप्रिल 1997 रोजी हत्या केली होती. मुन्ना धारी हा छोटा राजन टोळीचा सदस्य होता. त्यावेळी पोलिसांनी लईक अहमद फिदा हुसैन शेखविरुद्ध भादंविच्या कलम 302, 34 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3,25 अन्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर,1998 मध्ये न्यायालयाने आरोपीची जामिनावर सुटका केली. जामिनावर सुटल्यानंतर आरोपी शेख परागंदा झाला होता. शेख कोणत्याही न्यायालयीन सुनावणीत हजर झाला नसल्याने त्याला फरारी घोषित करण्यात आले. तब्बल 25 वर्षांपासून शूटर फरार होता.
बनला टॅक्सी चालक : परंतु पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला होता. शेख हा मुंब्रा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथे शोध मोहीम राबवली. परंतु शेख तेथे सापडला नाही. विशेष म्हणजे त्याला कोणी ओळखू शकले नाही. दरम्यान शेख हा ठाणे शहरात टॅक्सी चालवण्याचे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपी शेखला रेल्वे स्टेशनवरुन अटक केली.
खून प्रकरणात छोटा राजनची निर्दोष मुक्तता: दरम्यान कामगार नेते कॉम्रेड दत्ता सामंत यांच्या खुनाच्या आरोपातून अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. कॉम्रेड दत्ता सामंत यांचा 1997 मध्ये खून झाला होता. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर त्यांच्या खुनाचा आरोप होता. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज पुराव्याअभावी छोटा राजनला निर्दोष मुक्त केले. 16 जानेवारी 1997 रोजी डॉक्टर दत्ता सामंत पवईहून घाटकोपरच्या दिशेने जात होते. पंतनगर येथे जात असताना पद्मावती रोडवर त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, चार अज्ञात आरोपी बाईकवर आले आणि त्यांनी दत्ता सामंत यांच्यावर 17 गोळ्या झाडल्या होत्या.
हेही वाचा-