मुंबई Mumbai Crime News : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ५ने नोकरीची आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या बोगस जॉब रॅकेटचा पर्दाफाश केलाय. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ५ ने पुढील तपासात पश्चिम बंगालमधून दोन फरार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 482 पासपोर्ट जप्त करण्यात आली आहेत. पतित पबन हलदर (36) आणि मोहम्मद इलियाझ अब्दुल सत्तर शेख मन्सूरी (49) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये जाऊन केली दोघांना अटक : गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितलं की, नोकरीची आमिष दाखवून फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर पोलीस या टोळीतील दोन मुख्य सूत्रधारांचा शोध घेत होते. दोघेही पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती मिळताच कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन दोघांना अटक केली. गुन्हे शाखेने आरोपींकडून 482 पासपोर्ट जप्त केले आहेत. आरोपींनी नोकरी देण्याच्या नावाखाली लोकांकडून 40 ते 60 हजार रुपये घेतले होते.
आरोपी पश्चिम बंगालमध्ये लपून बसले होते : आरोपींनी लोकांकडून पैसे घेण्यासाठी एकूण २६ बँक खाती उघडल्याचे तपासात समोर आलं आहे. या खात्यात ७६ लाख रुपये आल्याचे समोर आल्यानंतर ते पोलिसांनी जप्त केले. तक्रारदार यांना ते न्यायालयाच्या आदेशानुसार परत करण्यात येणार आहेत. संपूर्ण भारतातील लोकांचे ४८२ पासपोर्ट मोहम्मद इलियाझ या आरोपीच्या मुंब्र्यातील घरातून सापडले. मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात आरोपी मोहम्मद इलियाझ याने भाडे तत्वावर घर घेतले होते. हे दोन्ही आरोपी नोव्हेंबरला बोगस जॉब रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये लपून बसले होते. तर या गुन्ह्यात वापरलेली २६ बँक खाती जप्त करण्यात आली आहे.
नोकरीसाठी इच्छुकांना बनावट व्हिसा दिला : आरोपींनी अनेक ठिकाणी भाड्याने कार्यालये उघडली होती. जिथे ते बेरोजगारांना अझरबैजान, ओमान, दुबई, सौदी अरेबिया, कतार आणि रशियामधील लोकांना नोकरी देण्याची आमिष दाखवत होते. पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितलं की, आरोपींनी जून महिन्यात दक्षिण मुंबईतील पॉश क्षेत्र असलेल्या बॅलार्ड पिअरमध्ये कार्यालय उघडले होते. तसेच नोकरीसाठी इच्छुकांना बनावट व्हिसा आणि नोकरीची नियुक्तीपत्रे दिली होती. ज्या लोकांकडून पैसे घेऊन व्हिसा देण्यात आला, त्यांनी तपासणी केली असता व्हिसा बनावट असल्याचं आढळून आलं.
नाव बदलून करत होते फसवणूक : लोकांनी दिलेले व्हिसा बनावट असल्याचे लोकांना समजल्यानंतर आरोपींनी बॅलार्ड पीअरचे कार्यालय बंद करून अंधेरी येथे नवीन कार्यालय सुरू केले. आरोपींनी बॅलार्ड पिअरमध्ये बॉम्बे इंटरनॅशनल कन्सल्टन्सीच्या नावाने कार्यालय थाटले होते. ही कंपनी फसवणूक करत असल्याचं समजल्यावर या लोकांनी बॉम्बे इंटरनॅशनल कन्सल्टन्सीचे कार्यालय बंद केले आणि त्यानंतर अंधेरी परिसरात इंडियन ओव्हरसीज प्लेसमेंट सर्व्हिसेस नावाची दुसरी कंपनी सुरू केली होती. अटक केलेले सर्व आरोपी नाव बदलून फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Scams With Job Lures: परदेशात नोकरी देण्याचे अमिष दाखवून 300 हून अधिक जणांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
- Nashik Sex Racket News : नाशिकमध्ये छुप्या सेक्स रॅकेटचा धुमाकूळ, आठ महिन्यात 50 पीडित महिलांची सुटका, 15 जणांना अटक
- आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, मालवाहू जहाजातून तब्बल २०० कोटी रुपयांचं कोकेन जप्त!