मुंबई: आरोपीविरुद्ध 1990 मध्ये बोरीवली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीची जामीनावर मुक्तता करण्यात आली. मात्र न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपी हजर राहत नव्हता. त्यानंतर आरोपी विश्वनाथ उर्फ बाळा विठ्ठल पवार याला दिंडोशी सत्र न्यायालयाने फरार घोषित केले होते. त्याच्या विरुद्ध सत्र न्यायालयाने जारी केलेले स्टँडिंग रिमांडनंतरही तो मिळून येत नसल्याने प्रदीर्घ काळापासून बजावणी प्रलंबित होती. हा आरोपी कळवाडी, परुळे, ता. वेंगुली, जि. सिंधुदुर्ग येथे असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार घनवट, पोलीस शिपाई पवार असे पथक तयार करून या आरोपीचा कडवाडी, परुळे येथे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. तो जानेवारी २०२३ मध्ये गावी येऊन गेल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
गुप्त माहितीच्या आधारे अटक: त्यानंतर या आरोपीचा शोध चालू ठेवण्यात आला असता बोरीवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर साळुंके यांनी आरोपी विश्वनाथ उर्फ बाळा विठ्ठल पवार याच्याविषयी महत्त्वाची माहिती प्राप्त केली . यानुसार आरोपी इंद्रलोक, फेज-५, भाईंदर पूर्व, जि. ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली. परंतु भाईंदर येथील ठिकाणी शोध घेतला असता त्या ठिकाणावरील घर विकून इतरत्र रहावयास गेल्याची माहिती मिळाली. तरी देखील आरोपीचा शोध घेणे सतत चालू ठेवण्यात आले. 18 फेब्रुवारीला पुन्हा विश्वसनीय माहिती मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय माडये यांच्या नेतृत्वाखाली साहेब पोलीस निरीक्षक सागर साळुंके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर, पोलीस शिपाई पवार आणि गजे असे पथक तयार करून इंद्रलोक फेज-६ भाईंदर पूर्व, जि. ठाणे येथे शोध घेतला. यावेळी आरोपी विश्वनाथ पवार हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर त्याला स्टॅंडिंग वॉरंट वरून अटक करण्यात आली. अटक आरोपीस सत्र न्यायाधीश, ११ वे न्यायालय, दिंडोशी सत्र न्यायालय येथे हजर करण्यात आले आहे.
अखेर पडल्या हातात बेड्या: अटक आरोपी हा गेल्या ३२ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून वास्तव्याची ठिकाणे वारंवार बदली करून पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई राजीव जैन, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ १५ मुंबई अजयकुमार बंसल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, बोरीवली विभाग, मुंबई धरणेद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरीवली पोलीस ठाण्याचे नमूद पथकाने ही कामगिरी अत्यंत कौशल्यपूर्ण पार पाडली आहे.
हेही वाचा: Thackeray Vs Shinde : पुण्यात ठाकरे, शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; जोरदार घोषणाबाजी