मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मुंबई पोलिसांकडून हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे. येत्या सणासुदीच्या काळात ड्रोनसारख्या उपकरणांच्या मदतीने किंवा मिसाईलद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
ड्रोनसदृश उपकरणांवर बंदी
मुंबई आणि परिसरात ड्रोन तसेच रिमोट कंट्रोलने ऑपरेट होणारे मायक्रोलाइट एअरक्राफ्ट उडवण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश 30 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत मुंबई शहरात लागू असतील.
26\11 चा दहशतवादी हल्ला
नोव्हेंबर 2008मध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात जवळपास 166 जणांचा मृत्यू झाला होता तर 300हून अधिक जण जखमी झाले होते. मृतांमध्ये लहान बालकांचा देखील समावेश होता. दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गाने मुंबईत प्रवेश केला होता. मुंबईच्या सीएसएमटी स्थानक, ताज हॉटेलसमवेत इतर सहा ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यात सर्वात जास्त मृतांची संख्या ही ताजमधील हल्ल्यातील होती. कसाब या एकमेव दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2012 रोजी कसाबला फाशी देण्यात आली.