मुंबई - लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य सुखी संसाराच्या स्वप्नात रममाण होतात. पुढील आयुष्य कसे असेल याचे नियोजन करतात. पण मुलुंडमधील एक नवविवाहित जोडपे याहून वेगळा विचार करणारे आहे. समाजासाठी झटणार्या कोरोना योद्धांसाठी काही तरी केले पाहिजे, हा विचार सध्या त्यांच्या डोळ्यासमोर आहे. याच हेतूने त्यांनी सामाजिक कार्य सुरू केले आहे. आपण थोडीफार मदत करू शकतो, याचे समाधान त्यांना आहे.
टाळेबंदी काळात अनेकांची लग्न रखडली. अखेर, सरकारने नियमावली जाहीर करत लग्न करण्याची परवानगी दिली. त्यानंतर काही जणांनी 50 जणांच्या उपस्थितीत लग्न उरकलं. अशाच पद्धतीने मीरा आणि अभिषेक कुलकर्णी यांनी 25 जूनला लग्न केलं. विवाह झाल्यानंतर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत त्यांनी कोरोना योद्ध्यांना मदत करण्याचे ठरवले. विवाहानिमित्त जे पैसे वाचले, त्याचा सदुपयोग झालाच पाहिजे. आपले अनुकरण इतर नवदाम्पत्यांनीही केले पाहिजे. हा विचार करून मीरा आणि अभिषेकने नवघर पोलीस ठाण्यात कार्यरत कोरोना योद्धा पोलिसांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लढ्यात नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या मुलुंड नवघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना व अधिकाऱ्यांना अभिषेक कुलकर्णी आणि मीरा कुलकर्णी यांनी शुक्रवारी स्वत: नवघर पोलीस ठाण्यात जाऊन मास्क, सॅनिटायझरचे मोफत वाटप केले तसेच दुपारचे जेवण देवून पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.
मुलुंड पूर्वच्या लक्ष्मीबाई इंग्लिश मिडीयम स्कुलचे संचालक प्रसाद कुलकर्णी यांचे चिरंजीव अभिषेकचे २५ जून रोजी सेरेमोनियल बँकवेट हॉल येथे मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीने शासकीय नियमांचे पालन करत मीरासोबत लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी मुलुंड नवघर रोडच्या पोलिस बंधूंना मास्क, सॅनिटायझर व जेवून देवून कोरोना काळात आघाडीवर राहून करत असलेल्या पोलिसांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुलुंड नवघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांनी याप्रसंगी नवदाम्पत्यांना आशीर्वाद देवून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे.
आम्ही आता मुलुंड परिसरात प्रत्येक आठवड्यात छोटा छोटा उपक्रम घेऊन कोरोना विरुद्ध लढणार्या योद्धाना जीवनावश्यक वस्तूची मदत करणार आहोत. या लॉकडाऊन काळात ज्यांची लग्न होणार आहेत. त्यांनी ही अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात खर्च वाचलेला आहे असे अभिषेक कुलकर्णीने सांगितले.