मुंबई - दक्षिण मुंबईतील मनीष मार्केटच्या मागील बाजूस असणाऱ्या मुसाफिरखाना, बर्मा गल्ली, साबुसिद्दीक मार्ग इत्यादी परिसरातील सुमारे ५४ अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे. 'ए' विभागाच्या या कारवाईत अनधिकृत स्टॉल्स आणि शेड्सही तोडण्यात आले. या कारवाई दरम्यान पालिकेने फेरीवाल्यांचा चार ट्रक भरून माल जप्त केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ १ चे उपायुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या परिसरात अशा प्रकारची कारवाई यापुढेही नियमितपणे करण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील रस्ते आणि पदपथ मोकळे झाले आहेत.
कारवाई करण्यासाठी महापालिकेला मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य लाभले. ४० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी तैनात होता. तर, महापालिकेचे सुमारे ६० कामगार, कर्मचारी, अधिकारी या कारवाईसाठी उपस्थित होते.