मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती विसर्जनासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. बाप्पाच्या आगमनापासून ते ११ दिवसांच्या गणपती मुर्तीच्या विसर्जनासाठी चौपाट्या, कृत्रिम तलावाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी आवश्यक सुरक्षा तसेच अधिकारी व कर्मचारीही तैनात केले आहेत.
गणरायाचे आज गुरुवारी विसर्जन केले जाणार आहे. मुंबईत सुमारे २ लाख घरगुती गणपती तर ११ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आगमन आणि विसर्जन आराखडा तयार केला आहे. समुद्र चौपाटी, खाडी, नैसर्गिक तलाव आणि कृत्रीम तलाव अशा ठिकाणी विसर्जनाची सोय उपलब्ध करुन दिली आहे. राज्य सरकार, पोलीस, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, सामाजिक संस्था, खाजगी रुग्णालये आदींची विसर्जनासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. विसर्जन स्थळावर जीवरक्षक, रुग्णवाहिका, प्रथमोपचार केंद्र, ध्वनिक्षेपक, मोटरबोट, स्वागत कक्ष, चौकशी व नियंत्रण कक्ष, स्टील प्लेट, तात्पुरते शौचालये, निर्माल्य कलश, निरीक्षण मनोरे, फ्लड लाईट, सर्च लाईट, डंपर, जर्मन तराफे, विद्युत व्यवस्था, मनुष्यबळ, हॅम रेडिओ, अग्निशमन दल, आपत्कालिन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
पालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुविधा -
विसर्जनाच्या वेळी मोठ्या गणेश मूर्तीं लोखंडी ट्रॉलीवरुन चौपाटीवरील रेतीमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे यासाठी चौपाटयांच्या ठिकाणी ८९६ स्टीलच्या प्लेट लावण्यात आल्या आहेत. छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ४५ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६३६ जीवरक्षकांसह ६५ मोटर बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी २१८ निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. कलशामधील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर असे एकूण २६७ वाहने विसर्जनस्थळी तैनात ठेवण्यात आली आहेत. पालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱयांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी एका नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच इतर ७८ नियंत्रण कक्ष व ४२ निरिक्षण मनोरे तयार करण्यात आली. ८१ स्वागत कक्ष, आरोग्य विभागाकडून ६९ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘बेस्ट’ द्वारे २७१७ दिवे (फ्लड लाईटस) व ८३ शोधदीप (सर्च लाईट) ची व्यवस्था, नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या ८४ शौचालयांची (मोबाईल टॉयलेट्स) व्यवस्थाही करण्यात आली आहे.
गणेश भक्तांनी विसर्जनाप्रसंगी काळजी घ्यावी-
(१) खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नका.
(२) भरती व ओहोटीच्या वेळांची माहिती समुद्रकिनाऱयांवर लावण्यात आली आहे ती समजून घ्या.
(३) मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
(४) अंधार असणाऱया ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्याचा प्रयत्न करु नका.
(५) मोठ्या गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनाकरिता समुद्रात जाणाऱया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिरगणती करुन जावे.
(६) गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्यतो तराफ्यांचा वापर करावा.
(७) समुद्रात / तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित त्याची माहिती, अग्निशमन दलाच्या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.
(८) नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.
(९) अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
(१०) भाविकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात / विसर्जनस्थळी जाण्यापासून मज्जाव करावा.
(१२) गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन करतेवेळी पाण्यात जेलीफिश चावू नये म्हणून गमबुट घालावेत.
(१३) मद्यप्राशन करुन समुद्रकिनाऱयावर विसर्जनस्थळी जाऊ नये, कारण अशा व्यक्तिवर मस्त्सदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.
तसेच, समुद्रातून बाहेर आल्यावर आपणांस मत्स्यदंश झाल्याचे जाणवल्यास तात्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी. अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावणे. माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे, जेणेकरुन जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही. मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या समुद्रकिनाऱयावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामुल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
समुद्रात भरती व ओहोटी-
अनंत चतुर्दशी दिनी समुद्रास भरती आणि ओहोटी असून सर्वांनी विशेष काळजी घ्यावी,असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
गुरुवार- पहाटे ०४.३८ वा. (ओहोटी) ०१.०८ मी.
सकाळी ११.२० वा. (भरती) ०४.०० मी.
सायंकाळी १७.२५ वा. (ओहोटी) ०१.४७ मी.
रात्री २३.२५ वा. (भरती) ०३.७० मी.
शुक्रवार- पहाटे ०५.१२. वा. (ओहोटी) ००.९९ मी.