मुंबई - मुंबई महापालिकेने कोरोनाचे मृत्यू लपवल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. त्यानंतर पालिकेने राज्य सरकारकडे 862 मृत्यूंची नोंद केली आहे. मात्र, पालिकेने कोरोना मृत्यू लपवले नाहीत तर त्या संदर्भातल्या प्रलंबित असलेल्या रिपोर्टच्या नोंदी पालिकेकडे उशिराने आल्या, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने देत भाजपच्या आरोपांचे खंडण केले आहे.
कोरोना रुग्ण आणि मृत्युंबाबतच्या सर्व माहितीचे संकलन करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या एपिड सेल आणि साथरोग नियंत्रण कक्षाकडे ८ जूनपर्यंत वेळेवर आणि अद्ययावत माहिती येत नव्हती. मात्र, ८ जून रोजी सर्व कोरोना मृत्युची नोंद ४८ तासांच्या आत करा, असे सक्त आदेश पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिल्यानंतर ही माहिती एपिड सेलकडे यायला लागली. त्यामुळे ती माहिती लपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पालिकेने स्वतःहून व प्रयत्नपूर्वक सर्व रुग्णालयांना सक्तीचे आदेश देऊन व पाठपुरावा करुन या सर्व मृत्युची माहिती गोळा केली. ती शासनाला सादर करुन लोकांसमोर आणलेली आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
लोकांसमोर कोरोनाबाबतची माहिती पारदर्शक व स्वयंस्फूर्तीने आणण्याचा पालिकेचा प्रयत्न होता आणि भविष्यातही राहील. याच प्रकारचे प्रयत्न विभाग स्तरावरसुद्धा करण्यात येत असून त्याबाबतही माहिती अद्ययावत करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत. माहिती जमवून ती अद्ययावत करणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, असेही पालिकेने स्पष्ट केले.
त्यामुळेच मृत्यूची संख्या ४८ तासांत कळवण्याचे काढले आदेश...
मुंबईतील एका खासगी रुग्णालयाने ६ जून रोजी अचानक १७ मृत्यू जाहीर केले. याची दखल घेत पालिका आयुक्तांनी त्याबाबत सखोल चौकशी केली. तेव्हा त्या दिवशी केवळ १ मृत्यू झालेला असून इतर १६ मृत्यू हे पूर्वी जाहीर न केलेले असल्याची बाब उघड झाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पालिका, सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना ४८ तासांच्या आत अशा पूर्वीच्या मृत्युंबाबतची माहिती विनाविलंब व न चुकता महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे (एपिड सेल) सादर करण्याचे सक्त आदेश पालिका आयुक्तांनी जारी केले. त्यानुसार सातत्याने पाठपुरावा करुन वेळेत ही माहिती इतर रुग्णालयांकडूनही उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यामुळे यापूर्वी जाहीर न केलेल्या एकूण ८६२ मृत्युंबाबतची माहिती १२ ते १५ जूनदरम्यान महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडे आली. ही माहिती पालिकेने तत्काळ राज्य सरकारला खुलासेवार आकडेवारीसह अहवाल सादर करुन दिली, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.