मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. दुसरी लाट ओसरलेली नाही. त्यातच, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने ही निवडणूक ठरल्या वेळी म्हणजेच, फेब्रुवारी 2022 मध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
'निवडणुकीच्या कामाला लागा'
मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली होती. मार्च 2017 ला महापौरांची निवड झाली. महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असल्याने, फेब्रुवारी 2022 मध्ये पालिकेची निवडणूक घ्यावी लागणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार असल्याने अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूकही पुढे ढकलली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत काय तयारी करावी, अशा आशयाचे पत्र पालिकेने राज्य निवडणुक आयोगाला पाठवले होते. त्यानुसार आज राज्य निवडणुक आयोग व मुंबई महापालिका निवडणुक विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
'परिस्थितीनुसार निर्णय'
निवडणूक घेण्यापूर्वी प्रभांगाची फेररचना केली जाणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार ही फेररचना करण्यात येणार आहे. पालिकेच्या निवडणुक विभागाच्या काही शंका होत्या. त्यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्यांना निवडणुकीची तयारी सुरु करायला सांगितले असून, प्रभागाच्या फेररचनेपासून सुरवात होणार आहे. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण, मतदार यादी अंतिम झाल्यानंतर बुथ निश्चित करण्यात येतील, असे राज्य निवडणुक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी सांगितले. निवडणुक निश्चित कालावधी नुसार होईल. यानुसारच सर्व कामे करण्यात येत आहेत. मात्र,अंतिम निर्णय परीस्थीतीनुसार होईल असेही मदान यांनी सांगितले.
'प्रभाग रचना बदलणार'
२०१७ च्या निवडणुकीत झालेल्या प्रभाग रचनेत शहर विभागातील सात प्रभाग कमी झाले होते. त्याचबरोबर चेंबूर, घाटकोपर, भांडूप विक्रोळी वांद्रे पुर्व या भागातील प्रत्येक १ प्रभाग कमी झाला हाेता. दुसऱ्या बाजूला उत्तर मुंबईतील गोरेगाव, दहिसर येथील प्रत्येक १ आणि मालाड कांदिवली येथील प्रत्येकी दोन प्रभाग वाढले होते.