मुंबई - मलाड मालवणी येथे बुधवारी रात्री इमारत कोसळून 11 जणांचा नाहक बळी गेला आहे. मुंबईत पहिल्याच पावसात झालेल्या या इमारत दुर्घटनेने मुंबईतील धोकादायक इमारती आणि झोपडपट्टीमधील घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ईटीव्ही भारतने मान्सूनपर्वीच या इमारतींच्या स्थितीचा आढावा घेतला होता. त्यात दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली होती. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने यासंबंधीची माहिती दिली होती. त्यानुसार 14500हून अधिक उपकरप्राप्त इमारतीपैकी 21 इमारती अतिधोकादायक आढळल्या आहेत. या इमारतीना आता त्वरित नोटिसा बजावत रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात येणार असल्याची माहिती म्हाडा दुरुस्ती मंडळ सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली होती.
कोरोना लॉकडाऊनमुळे यादी विलंबाने
दक्षिण मुंबईतील 14500हून अधिक इमारती धोकादायक आहेत. या इमारतीचा पुनर्विकास रखडला आहे. अशावेळी या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दुरुस्ती मंडळ करते. तर या इमारतीची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. यात जीवितहानी आणि वित्तहानी होते. तेव्हा जीवितहानी आणि वित्त हानी रोखण्यासाठी दरवर्षी दुरुस्ती मंडळ पावसाळ्याआधी सर्व इमारतीचे सर्व्हेक्षण करत 15 मे पर्यंत अतिधोकादायक इमारतीची यादी जाहीर केली जाते. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवले जाते. पण मागील वर्षी कोरोना-लॉकडाऊनमुळे ही यादी उशिरा प्रसिद्ध झाली होती. तर यंदाही लॉकडाऊनचा फटका या प्रक्रियेला बसला आहे. त्यामुळेच ही यादी विलंबाने प्रसिद्ध झाली आहे. दरम्यान दुरुस्ती मंडळाने दोन टप्प्यात हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5517 इमारतीचा सर्व्हे करण्यात आला. यात एकही इमारत अतिधोकादायक आढळली नाही. तर दुसऱ्या टप्प्यात 9048 इमारतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले असता त्यात 21 इमारती अतिधोकायदायक आढळल्या आहेत.
247 कुटुंबाच्या स्थलांतराचे आव्हान
अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यांना नोटीस बजावत म्हाडाच्या संक्रमण शिबिरात हलवण्यात येते. अन्यथा रहिवासी स्वतः आपली सोय करतात. पण एकदा का म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गेल्यानंतर पुन्हा हक्काच्या घरात कधी येणार याचे उत्तर नसते. 30 ते 40 वर्षे लोकं संक्रमण शिबिरात राहात आहेत. महत्वाचे म्हणजे ही संक्रमण शिबिरे उपनगरात मोठ्या संख्येने आहेत. तर शहरात खूपच कमी शिबिरे आहेत. तेव्हा रहिवासी संक्रमण शिबिरात जाण्यास नकार दिला जातो. त्यामुळे या रहिवाशांना बाहेर काढणे म्हाडासाठी मोठे आव्हान असते. कधी कधी म्हाडाला पोलीस बळाचा वापर करत वा पाणी-वीज कापत रहिवाशांना स्थलांतर करण्यास भाग पाडले जाते. त्यानुसार आता 247 कुटुंबाना हलवण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासमोर आहे. या 21 इमारतीत एकूण 717 गाळे आहेत. यातील 460 गाळे निवासी असून 257 गाळे अनिवासी आहेत. 460 निवासी रहिवाशांपैकी 193 रहिवासी याआधीच स्थलांतरीत झाले आहेत. तर 20 लोकांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आहे आहे. त्यामुळे आता केवळ 247 रहिवाशांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी दुरुस्ती मंडळावर आहे. त्यानुसार या रहिवाशांना दोन दिवसांत नोटीस बजावण्यात येणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले आहे.
रहिवासी याला विरोध करण्याची शक्यता
दरम्यान मंडळाकडे आजच्या घडीला शहरात अंदाजे 50 संक्रमण शिबिराचे गाळे आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने रहिवाशांना उपनगरात हलवावे लागणार असल्याने रहिवासी याला विरोध करण्याची शक्यता जास्त आहे. पण आपण स्वतः रहिवाशांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांना स्थलांतरासाठी तयार करू असेही त्यांनी सांगितले आहे. तर शहरात अधिक गाळे उपलब्ध होतात का यासाठी ही आम्ही प्रयत्न करत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
21 अतिधोकादायक इमारतीची नावे अशी
1. इमारत क्र. 144 एम जी रोड, अ-1163
2. इमारत क्र 101-111 चारा इमाम रोड
3. इमारत क्र 74 निझाम ट्रस्ट
4. इमारत क्र 123 किका स्ट्रीट
5. इमारत क्र 166-डी मुंबादेवी रोड
6. इमारत क्र 2-4 ए, 2री भोईवाडा लेन
7. इमारत क्र 42-मस्जिद स्ट्रीट
8. इमारत क्र 14-भंडारी स्ट्रीट, मुंबई-04
9. इमारत क्र 1-3-5 संतसेना महाराज मार्ग
10. इमारत क्र 3-सोनापूर, 2री, क्रॉस लेन
11.इमारत क्र 2-4, मोरारजी संतुक लेन, मुंबई-02
12. इमारत क्र 387-311, बदामवाडी, व्ही पी रोड, 1458(2)-(3)
13. इमारत क्र 273-281 फ्रॉकलॅन्ड रोड, डी-2219-23011
14. इमारत क्र 1-खेतवाडी 12 वी गल्ली, (डी-2049)
15. इमारत क्र 31-सी व 33 ए आर रांगणेकर मार्ग क्र 19, पुरंदरे मार्ग, गिरगाव चौपाटी, मुंबई-डी-2445 (9), अ वर्ग
16. इमारत क्र 133 बी बाबूला टॅंक रोड, बेग मोहम्मद चाळ, उपकर क्र बी 3616 (1)
17. इमारत क्र 54-उमरवाडी, 1ली गल्ली, छत्री हाऊस, 3 बी-3517
18. इमारत क्र 104-106-मेघाजी बिल्डिंग, ए, बी,सी विंग, शिवदास चापसी मार्ग
19. इमारत क्र 15-19, के के मार्ग व 1-3 पायस स्ट्रीट
20. इमारत क्र 64-64 ए भंडारी स्ट्रीट
21. इमारत क्र 391 डी, बदामवाडी, व्ही पी रोड, 1457(1), 57 (1ए)