मुंबई : रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार असून सीएसएमटी - बेलापूर आणि ठाणे ते पनवेल यादरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. तसेच या दरम्यान सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी मार्गावर विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर - घाटकोपर आणि नेरूळ - घाटकोपर या दरम्यान लोकल फेऱ्या या नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवरील मेगब्लॉक - मुंबईत मागील चार दिवसापासून सतत पाऊस पडत असल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मध्य रेल्वे व हार्बर रेल्वेवर याचा मोठा फटका बसला आहे. अशातच आज मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतल्याने अनेक गाड्या रद्द कराव्या लागणार आहेत. तर यादरम्यान लोकल विलंबाने धावणार आहेत. माटुंगा ते मुलुंड यादरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. दोन्ही जलद मार्गावर हा ब्लॉक असून यादरम्यान लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याने अनेक फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तर लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
कालही बसला फटका- मुंबई सतत पडणाऱ्या पावसामुळे त्याचा मोठा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. शुक्रवारी वडाळा ते मानखुर्द दरम्यान ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे हार्बर लोकल अर्धा तास बंद करावी लागली होती. पाऊस थांबल्यानंतर साचलेल्या पाण्याचा निचरा होईपर्यंत या लोकल थांबून ठेवण्यात आल्या होत्या. मुसळधार पावसामुळे विशेष करून मध्य व हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे रूळ पाण्याखाली गेला आहे. ज पर्यंत पाण्याचा निचरा होत नाही तोपर्यंत लोकल थांबून ठेवावी लागते. विशेष करून घाटकोपर, माटुंगा, शिव, कुर्ला या परिसरात पाणी जास्त प्रमाणात साचत असल्याकारणाने येथे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. त्या कारणाने लोकल बऱ्याच काळ जागेवरच थांबून होत्या. तसेच पश्चिम रेल्वेवर काल गोरेगाव ते मालाड दरम्यान पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने याचा फटका सुद्धा प्रवाशांना बसला होता. मुंबईत शनिवारी सुमारे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा-