नाशिक : झाकीर हुसैन रुग्णालय ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सावधगिरीचा पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 'कोविड सेंटरमध्ये अपघात घडवलाही जाऊ शकतो. यासाठी सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे. तसेच सुरक्षा रक्षकांनीही वारंवार ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली पाहिजे', असे पेडणेकर यांनी म्हटले आहे.
'सर्व कोविड सेंटर मधील ऑक्सिजन प्लांटमध्ये जाण्यास मज्जाव घालण्यास सांगितले आहे. कोविड सेंटरचे ऑडिट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नगरसेवकांनी प्रत्येक वार्डात लसीकरण सेंटर उभारावेत', असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत.
काय आहे नाशिक हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन दुर्घटना प्रकरण?
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २४ रुग्णांचा मृत्यू झाला.