मुंबई - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्याने दुष्काळग्रस्तांसाठी उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर मुंबईमधील विकासकामे आणि पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.
मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. चौथ्या टप्प्यात राज्यातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मतदान झाले. महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघात मतदान झाल्याने राज्य सरकारने आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याअनुषंगाने दुष्काळाची कामे आणि दुष्काळग्रस्तांना मदत करता यावी म्हणून आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे.
पावसाळ्यापुर्वी मुंबईतली नाले सफाईची कामे होणे गरजेचे -
मुंबईतही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचते, त्यासाठी पावसाळयापूर्वी मुंबईत नाले सफाईची कामे मोठ्या प्रमाणात केली जातात. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्ती केली जाते, पावसाळ्यात ही सर्व कामे केली जाऊ शकत नसल्याने पावसाळ्यापूर्वी ती केली जातात. या कामांना गती यावी म्हणून आचारसंहिता शिथिल करणे गरजेचे आहे. आचारसंहिता असल्याने नवे धोरणात्मक निर्णयसुद्धा घेता येत नाहीत. तसेच निवडणुकीच्या कामासाठी पालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात गुंतले आहेत. यामुळे विकास कामावर परिणाम होणार आहे. मुंबईकरांना हा पावसाळा चांगला जावा म्हणून आचारसंहिता शिथिल करण्याची गरज असल्याचे महापौरांनी म्हटले आहे.