मुंबई Mumbai Local News : पश्चिम रेल्वेच्या साडेआठ किलोमीटर लांबीच्या अतिरिक्त सहाव्या मार्गिकेसाठी 27 ऑक्टोबरपासून नॉन इंटरलॉकिंग कार्य सुरू केले जाणार आहे. हे काम 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळं अडीच हजारांपेक्षा अधिक रेल्वे फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळं प्रवाशांनी या कालावधीत वेळापत्रक पाहून प्रवास करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलय.
पश्चिम रेल्वे मंडळाकडून विशेष मोहीम : पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, विरार, वलसाडपासून ते चर्चगेट पर्यंत रोज सुमारे तीस लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, मुंबई रेल्वे उपनगरीय मार्गीकेमध्ये इंटरलॉकिंग सुधारणा कामासाठी गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी सहाव्या रेल्वे मार्गीकेचं काम सुरू केलं जाणार आहे. यासाठी विशेष मोहीम पश्चिम रेल्वे मंडळाकडून राबवली जाणार आहे.
कोणत्या आणि किती ट्रेन रद्द होणार : 26 ऑक्टोबर पासून ते 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत रेल्वेच्या 2,525 सेवा रद्द होणार आहेत. त्या डाऊन आणि अप या दोन्ही दिशेला असणार आहेत. 27 ऑक्टोबरला 256 तर तर त्याच्या पुढच्या दिवसापासून रोज 230 आणि 300 पेक्षा अधिक सेवा रद्द होणार आहेत. तर 4 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबर रोजी 93 सेवा आणि 110 रेल्वेच्या सेवा रद्द होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिलीय.
भविष्यात धावतील अतिरिक्त ट्रेन : पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना सोयी-सुविधा निर्माण करणं हे काम गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या सहाव्या मार्गिकेमुळे अधिक लाभदायक होणार आहे. नॉन इंटरलॉकिंग काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात एकूण अडीच हजारांपेक्षा अधिक रेल्वे सेवा रद्द केल्या जाणार आहेत. या इंटरलॉकिंग सिस्टीममुळं भविष्यात अतिरिक्त ट्रेन धावण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं प्रवाशांची तात्पुरती गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या वेळापत्रकाकडं पाहून प्रवास करावा. रेल्वेच्या या दुरुस्ती देखभाल कामाला सहकार्य करावं, असं आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलंय.
हेही वाचा :