मुंबई - शिवसेना हिंदुत्व कधीही सोडत नाही. आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये. हिंदुत्व ही आमची शाळा, आमची विचारधारा आहे आणि या शाळेत कोणीही येऊन आम्हाला धडे देऊ नये, अशी टीका शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) केली. भाजपकडून अयोध्या दौऱ्यावर करण्यात आलेल्या टीकेला त्यांनी या शब्दात प्रत्युत्तर दिले. तसेच राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन जागा लढवणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसची अतिरिक्त मते राष्ट्रवादी उमेदवार फौजिया खान यांना असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडी सरकार आणि राज्यसभा निवडणूकवरही चर्चा झाली, अशी माहिती राऊत यांनी दिली. तसेच ही आमची नियमित भेट होती, राजकारणातील दोन नेते कायम भेटत राहत असतात तशीच आमची ही भेट होती असा खुलासाही त्यांनी केला. तसेच आजच्या भेटीत खासदार सुप्रिया सुळे सोबत होत्या.
हेही वाचा - गणेश नाईकांच्या रक्तातच गद्दारी, आव्हाडांचा नाईकांवर निशाणा
सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर म्हणाल्या, ज्याप्रमाणे लोक पंढरपूर आणि इतर तीर्थक्षेत्राला जातात, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. तसेच राऊत म्हणाले की, त्यामुळे यावर टीका टिपणी करण्याचा विषयच नाही. ही आमची श्रद्धा आहे. तसेच राज्यात आमच्यासोबत आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार चालवते. कदाचित भाजपला हीच गोष्ट डोळ्यात सळत असेल त्यामुळे ते टीका करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. विरोधासाठी विरोध नको ही आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.
मनसेच्या स्थापनेला आज १४ वर्ष पूर्ण होत असल्याच्या संदर्भात विचारले असता, त्यांना आम्ही त्यांना शुभेच्छा देतो, असे ते म्हणाले.