मुंबई - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत गणेश भक्तांनी भर पावसात आज गौरी गणपतीला निरोप दिला. मुंबईच्या समुद्र किनारी व कृत्रिम तलावात आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ३२ हजार गौरी आणि गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
शहरात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील सर्व चौपाट्या, तलाव आणि जलाशय परिसरात गणपती विसर्जनासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती.
हेही वाचा - गौरी-गणपतीच्या विसर्जनाकरिता भांडुपच्या शिवाजी तलावावर गर्दी
मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर ढोलताशांचा गजर आणि गणरायाचा गजर सुरु होता. पावसाची रिपरिप सुरू असतानाही भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. पुरुषांबरोबर स्त्रिया, तरुण- तरूणींसह, अबालवृध्दांनी बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर गर्दी केली होती. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पांचे विसर्जन पार पाडले. विसर्जन स्थळी मुंबई महानगरपालिकेतर्फे जय्यत तयारी ठेवण्यात आली होती.