मुंबई Mumbai Crime News : लालबागशेजारीच असलेल्या काळाचौकी परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या २५ वर्षीय तरुणीवर घरात घुसून तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वार केला. या हल्ल्यात मुलीच्या गळ्याची नस आणि हाताची नस कापली गेली असून ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 307, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी समीर राऊत (वय ४४) याला अटक केल्याची माहिती, काळाचौकी पोलीस ठाण्याचे (Kalachowki Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
आरोपी सोबतचे प्रेम संबंध तरुणीने तोडले : आरोपी समीर राऊतचे जखमी तरुणीसोबत गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून आरोपी सोबतचे प्रेम संबंध तरुणीने तोडले. ते प्रेमसंबंध पुन्हा ठेवण्यासाठी तरुणीने नकार दिला. याचा राग मनात ठेवून तरुणीशी भांडण करून तिला शिवीगाळ केली. त्यानंतर घरात एकटी असताना तिच्यावर वार केला. तरुणीच्या गळ्यावर आणि हाताच्या नसेवर वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. 25 वर्षीय जखमी तरुणी ही आपल्या दोन भावांसोबत राहते. दोन्ही भाऊ कामानिमित्त बाहेर गेले असताना, ती दुपारी दोनच्या सुमारास एकटी असताना आरोपी समीर राऊत यांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्याबाबत शेजाऱ्यांनी नोकरीसाठी गेलेल्या भावाला बोलावले. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत तरुणीला केईएम रुग्णालयात (KEM Hospital Mumbai) दाखल करण्यात आले.
आरोपीला काळाचौकी परिसरातून अटक : केईएम रुग्णालयातून काळाचौकी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. तरुणीस जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी समीर राऊतने तरुणीच्या गळ्यावर आणि उजव्या हाताच्या मनगटावर वार करून गंभीर दुखापत केली. आरोपी समीर बाळकृष्ण राऊत याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला काळाचौकी परिसरातून अटक करण्यात आली असल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. बुधवारी आरोपी समीर राऊत याला कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान जखमी तरुणी के.ई एम रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपी हा बदली वाहन चालकाचे काम करतो.
हेही वाचा -