मुंबई Mumbai Crime News : आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या सह्या करुन अज्ञात आरोपीनं विमा कंपनीची एक कोटी रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या अधिकाऱ्यानं दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पैसे झारखंडमधील आरोपीच्या खात्यात हस्तांतरित झाल्याची माहिती दादर पोलिसांनी दिली आहे.
- खोट्या सह्या करुन फसवणूक : दादर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीच्या अधिकाऱ्यानं तक्रार देताना सांगितले की, कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या खोट्या सह्या करुन अज्ञात आरोपीनं कंपनीकडून एक कोटी रुपये घेतले. त्यामुळे आयसीआयसीआय बँकेची फसवणूक झाली आहे.
बनावट कागदपत्रे वापरुन केला अर्ज : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून कंपनीचे उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या आदेशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर अज्ञात आरोपीनं एका व्यक्तीच्या बँक खात्यात एक कोटी रुपये हस्तांतरित केले, अशी माहिती दादर पोलिसांनी दिली. आरोपीनं 25 ऑक्टोबरला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत बनावट कागदपत्रे वापरुन अर्ज केला. त्यानंतर 28 ऑक्टोबरला पैसे हस्तांतरित केले, असं तक्रारदारांनी पोलिसांना सांगितलं.
खाते तपासल्यानंतर फुटलं बिंग : कंपनीच्या अधिकाऱ्यानं 5 नोव्हेंबरला खाते तपासल्यानंतर कंपनीच्या खात्यातून एक कोटी रुपये अज्ञात व्यक्तीच्या खात्यात गेल्याचं आढळून आलं. कंपनीनं दुरुस्तीचा फॉर्म तपासला, तेव्हा त्यावर उपाध्यक्ष आणि ऑपरेशन हेड यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. त्याबाबत दोघांना विचारणा केली असता, दोघांनी दुरुस्तीच्या फॉर्मवर सही करण्यास नकार दिला असल्याचं सांगितलं.
झारखंडच्या बँक खात्यात गेले पैसे : कोणीतरी फसवणूक करून पैसे ट्रान्सफर केल्याचं कंपनीनं तपास केल्यावर लक्षात आलं. त्यानंतर कंपनीनं दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले, ते बँक खातं झारखंडमधील आहे, अशी माहिती दादर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यानं दिली.
हेही वाचा :