मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मुंबईत कोरोनाचे १७०० रुग्ण दररोज आढळून येत होते. पालिकेने ही संख्या ९०० ते १२०० पर्यंत आणली होती. मात्र सप्टेंबरच्या सुरूवातीला रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. बुधवारी १६२२, गुरूवारी १५२६, शुक्रवारी १९२९ तर शनिवारी १७३५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर काल रविवारी १९१० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
मुंबईत रविवारी कोरोनाचे १९१० नवे रुग्ण आढळून आले असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी २७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २८ पुरुष तर ९ महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा १ लाख ५५ हजार ६२२ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ७ हजार ८६६ वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज ९११ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा १ लाख २३ हजार ४७८ वर गेला आहे. सध्या मुंबईत २३ हजार ९३० सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७१ दिवस तर सरासरी दर ०.९८ टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या ५६८ चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच ७ हजार ०९९ इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी ८ लाख २४ हजार ८८६ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.