मुंबई - महानगरपालिकेच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या १७ दिवसात कोरोनाचे २८ हजार ७६ नवीन रुग्ण आढळले तर, ६०४ रुग्णांचा मृत्यू झाला. २६ ऑगस्टला रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ दिवस होता. १२ सप्टेंबरला हा कालावधी ५८ दिवसांवर आला आहे. १७ दिवसात हा कालावधी ३५ दिवसांनी घसरला आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार १५४ने वाढली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या प्रशासन आणि नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.
२६ ऑगस्टला कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाख ३९ हजार ५३२ इतकी होती. ७ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू झाला होता तर १८ हजार ९७७ सक्रिय रुग्ण होते. १ लाख १२ हजार ७४३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यावेळी रुग्ण बरे होण्याचा दर ८१ टक्के तर दुप्पट होण्याचा कालावधी ९३ दिवस इतका होता. गेल्या १७ दिवसांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने १२ सप्टेंबरला कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाख ६७ हजार ६०८ वर तर मृतांचा आकडा ८ हजार १०६ वर पोहचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २९ हजर १३१ झाली आहे. १ लाख ३० हजार १६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ७८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५८ दिवसावर घसरला आहे.
गणेशोत्सवा दरम्यान वाढलेल्या भेटीगाठीत निकटचा संपर्क, अनलॉक - ४ नंतर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले नागरिक व यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा यामुळे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा युध्द पातळीवर शोध घेतला जात असून त्यांची तत्काळ तपासणी केली जात आहे. रोजच्या चाचण्यांमध्येही वाढ केल्याने कोरोनाची आकडेवारी वाढलेली दिसत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.