मुंबई - राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून मंदीची लाट आहे. अशा परिस्थितीत महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच चालली आहे. हा पोरखेळ आता थांबवावा, असे मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.
महागाई, आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दादर स्थानकाबाहेर भाजप विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. अशा प्रकारची आंदोलने देशभरात कॉंग्रेसकडून करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - ...मग हे जनतेला दिलेला शब्द कसा पाळतील? - जयंत पाटील
जनतेने बहुमत दिले असूनदेखील महायुती जबाबदारीने वागत नसल्याचे चित्र आहे. आज अनेक दिवस उलटून गेले तरीही सरकार स्थापन होत नाही. त्यामुळे जनतेला वेठीस धरू नये. जनता नाराज आहे, जनतेने त्यांचे काम केलेले आहे. जनतेने तुम्हाला शासन बनविण्याची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कोणाला व्हायचे आहे, याचा तिढा लवकरात लवकर सोडवा. आताचे सरकार हे कामचलाऊ सरकार असून त्यांना संपूर्ण अधिकार नाहीत, असे ते म्हणाले.
महागाई कमी झाली पाहिजे, रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. शेतकरी हवालदिल झाले आहेत, ज्यांचे नुकसान झाले, त्यांचे पंचनामे करून एका आठवड्याच्या आत त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, असे गायकवाड यांनी सांगितले.