मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे (सीएए) समर्थन केले आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे (एनआरसी) मुस्लिमांसोबत हिंदूचीही गैरसोय होईल, असे सांगत एनआरसी राज्यात राज्यात लागू करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोणालाही देशाबाहेर काढू शकणारा सीएए कायदा नाही, असेही ते म्हणाले. सामना या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका मांडली. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.
पुढे बोलताना ते म्हणाले, हिंदूनाही त्यांचे नागरिकत्व सिद्ध करणे अवघड जाईल. यामुळे राज्यात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा कायदा लागू करणार नाही.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा या कायद्याला विरोध केला आहे.
हेही वाचा - 'हा देश जेवढा तुझ्या बापाचा, तेवढाच माझ्याही बापाचा'
सीएए कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या हिंदू, शिख, जैन, पारशी, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्माच्या लोकांना नागरिकत्व प्रदान करण्यात येणार आहे. त्यात 31 डिसेंबर 2014 ला किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर या कायद्याच्या विरोधात देशातील विविध भागांमध्ये निदर्शने करण्यात येत आहे.