मुंबई- भारतातील सर्व 130 कोटी नागरिक सुरक्षित आहेत. येथील मुस्लीम नागरिक मजबुरीत नाही तर मजबुतीत राहत आहेत. देशात प्रत्येकाला आंदोलन करणे, मत व्यक्त करण्याचा संविधानिक, सामाजिक अधिकार आहे. मात्र, सध्या आंदोलन करणाऱ्या नागरिकांना चुकीच्या पद्धतीने फूस लावली जात असल्याचे वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार आबास नक्वी यांनी केले. मुंबईतील हज हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा- निर्भया प्रकरण : 'तारीख पे तारीख...मात्र, प्रत्येक सुनावणी वेळी न्यायाची अपेक्षा कायम'
सध्या देशात सीएए, एनआरसी सारख्या गोष्टींना विरोध केला जात आहे. आमचे विरोधक त्याला खतपाणी घालत आहेत. मात्र, आमची भूमिका शांतता राखण्याची आहे, असेही ते म्हणाले.
भारत हा जगातील एकमेव देश आहे जिथे 2020 च्या हज यात्रेचे आयोजन संपूर्णपणे डिजिटल करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेकरुंची खासगी ट्रॅव्हल एजंटकडून होणारी फसवणूक पूर्णपणे थांबली आहे. हज सबसिडी बंद होऊनही हजला जाणाऱ्या यात्रेकरुंना याचा अतिरिक्त आर्थिक त्रास सहन करावा लागणार नाही, असा प्रयत्नही आम्ही करीत आहोत.
2020 च्या हज यात्रेत तब्बल 2 लाख भारतीय मुस्लीम नागरिक कुठल्याही सबसिडी शिवाय जात आहेत. यात तब्बल 1 लाख 23 हजार यात्रेकरू हे 'हज कमिटी ऑफ इंडिया'च्या माध्यमातून जात आहेत. यावर्षी भारतातील तब्बल 2 हजार 100 मुस्लीम महिला यात्रेला जात असल्याचे मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.