मुंबई : सध्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात आहे. यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नपूंसक म्हटले आहे. जे गेले काही महिने सरकारबद्दल जनता बोलते आहे. नपूंसक, बिनकामाचे म्हटले आहे. आता हे आम्ही तर नाही म्हटले, हे सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे. हे ज्या पद्धतीने सरकारमध्ये आले त्यावरून हे बोलले जात आहे. आजपर्यंत सर्वोच्च न्यायालय असे कोणत्याच राज्याबद्दल बोललेले नाही. पण, महाराष्ट्र सरकार बद्दल बोलते आहे.
न्यायालयाचे आभार मानतो : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, डोळे उघडू का? बोलू का, बोलू नको? वाचू का, नको वाचू का? हे जे चालले आहे. त्यालाच न्यायालयाने नपुंसक म्हटले आहे. जातीय दंगली वाढाव्या, समाजात तेढ राहावी असे ते काम करत आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जनतेचे डोके ठिकाणावर असून सरकारचे डोके ठिकाणावर आले पाहीजे.
देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, या सरकारचा उद्देश राज्यात अस्थिरता राहावी इतकाच आहे. राज्यात गृहमंत्र्यालय अस्तित्वात नाही. देवेंद्र फडवणीस हे पूर्वीचे फडणवीस नाहीत. जुने फडणवीस कुठे आहेत? त्याचा शोध घ्यावा लागेल. देवेंद्र फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्तपणे काम करत आहेत. काल संभाजीनगरला जी दंगल परिस्थिती झाली त्याला सरकार जबाबदार आहे. मिंधे गटाच्या अनेक टोळ्या यासाठी काम करत आहेत.
या सरकारचा जीव खोक्यात : आगामी निवडणुकांच्या तयारीवर बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडीच्या सभा दणक्यात होतील. तुम्ही खेड आणि मालेगाव पाहीले आता पुढली सभा पाचोऱ्यात होणार आहे. तेव्हा देखील तुम्ही पहाल. मंत्री भेटत नाहीत, सरकारचे अस्तित्व जाणवत नाही. म्हणून तर सर्वोच्च न्यायालयाला नपूंसक म्हणावे लागत. आम्ही तर त्यांना खोके सरकार म्हणतो. या सरकारचा जीव खोक्यात आहे. सर्वोच्च न्यायालय बरोबर तेच म्हणत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
सागाचे लाकूड महाराष्ट्रातून रवाना : अयोध्येत राम मंदिराचे काम जोरात सुरू आहे. या मंदिराच्या फर्निचरसाठी लागणारे सागाचे लाकूड महाराष्ट्रातून रवाना झाले. हे लाकूड घेऊन जाणाऱ्या ट्रकला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवा कंदील दाखवला. यावर देखील संजय राऊत यांनी सांगितले की, लाकूड महाराष्ट्रातून नेत आहात ते भाजपच्या मालकीचे नाही. महाराष्ट्राचे योगदान लढ्यात कायम आहे. महाराष्ट्राचे योगदान म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी दिलेला लढा आहे. लाकूड तुम्ही देत आहात पण हातोडा आम्हीच मारला आहे.