मुंबई - गोवंडी, मानखुर्दमधील झोपडपट्ट्यांमध्ये अनाधिकृत मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या भागत ३५० पेक्षा अधिक मोबाईल टॉवर आहेत. नागरिकांकडून या अनाधिकृत टॉवरवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे या अनाधिकृत टॉवरवर तत्काळ कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा सूचक इशारा मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा क्षेत्राचे विधानसभा उपविभाग अध्यक्ष सतीश वैद्य यांनी दिला आहे.
चार मजल्यापर्यंत अनाधिकृतरित्या बांधकाम
गोवंडी, मानखुर्द सारख्या ठिकाणी केवळ मोजक्या मोबाईल टॉवर्सना परवानगी असतानादेखील या परिसरात ३५०हुन अधिक मोबाईल टॉवर बसवण्यात आले आहेत. तसेच या झोपडपट्टी वसाहतमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. चार मजल्यापर्यंत येथे अनाधिकृतरित्या बांधकाम करण्यात आले आहे. तसेच त्यावर मोबाईल टॉवरही बसणण्यात आले आहेत. या अनधिकृत टॉवरवर कारवाई आश्वासन देऊन आता 4 वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.
तीन चार वर्षपासून पाठपुरावा
गोवंडी मानखुर्दमध्ये गल्लीबोळात मोबाईल टॉवर बसवल्यामुळे आजूबाजूचे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात फक्त ३६ मोबाईल टॉवर बसवण्याची परवानगी आहे. असे असून देखील ३५० हून अधिक टॉवर येथे बसवण्यात आलेले आहेत. सतीश वैद्य यांनी मागील तीन चार वर्षपासून पाठपुरावा करून अनेक तक्रारी केल्या. मात्र, यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. यानंतर सतीश वैद्य यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी एम पूर्व विभागाच्यावतीने या सर्व अनधिकृत टॉवरवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दीड वर्षहून अधिक काळ होऊनही अद्यापही कसलीच कारवाई नाही.