मुंबई - मान्सून योग्य दिशेने वाटचाल करत असून 10 जूनला तो ईशान्य भारतात पोहचला आहे. आज गुरुवारी 11 जूनला मान्सूनच्या उत्तरेकडील सीमेचा पश्चिम भाग कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशला पार करून तेलंगणातील अनेक ठिकाणी पोहोचला. याच प्रगतीमुळे मान्सून गोवा, दक्षिण कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण उडिशा येथे पोहचला आहे, अशी माहिती स्कायमेट या खासगी हवामान विषयक संस्थेनं दिली आहे.
मान्सूनची उत्तर सीमा 11 जूनला हरनई, सोलापूर, रामगुंडम, जगदलपूर, गोपालपूर, आगरताळा आणि तेजपुरपर्यंत पोहोचली. बंगालच्या खाडीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून चांगली प्रगती करत आहे. निर्माण झालेल्या या स्थितीचे क्षेत्र पुढे वाढण्यासोबत एकीकडे दक्षिण भारतात पावसाची वाटचाल वाढत आहे. तर दुसरीकडे मध्य भारतात मान्सून प्रगती करत आहे.
अनुमानानुसार पुढील 24 ते 48 तासांत मुंबईसह महाराष्ट्रच्या काही भागात आणि कोलकातासह पश्चिम बंगालमध्ये मान्सून पोहचेल. जसजसा मान्सून पुढे जाईल तसतसा देशातील अनेक भागात जोरदार पाऊस होईल.
मुंबई आणि कोलकातामध्ये 11 जून ही संशोधित तारीख मान्सूनच्या आगमनासाठी मानली जाते. या भागात 12 किंवा 13 जूनला आगमन होऊ शकते. हवामानशास्त्राच्या तज्ञांनुसार दोन ते चार दिवस आधी किंवा नंतर मान्सूनचे आगमन सामान्य मानले जाते. याच दरम्यान पश्चिमी किनाऱ्यांवर केरळपासून गोवा आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाची सक्रियता वाढेल. मध्य महाराष्ट्र- मराठवाडा येथे पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगडमध्ये अति जोरदार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागराच्या मध्य पूर्व भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. हे क्षेत्र उत्तर आंध्रप्रदेश आणि त्याला जोडून असलेल्या ओडिशाहुन आतील भागात पोहचेल. या स्थितीच्या प्रभावामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत आंध्रप्रदेश, दक्षिण ओडिशा आणि महाराष्ट्रातील विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल.
पूर्व भारतात मान्सून पश्चिम बंगाल पार करून ओडिशाच्या काही भागांना व्यापून बिहार किंवा झारखंडमध्ये पोहचू शकतो. पूर्व मध्यप्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशात मान्सून संभाव्य वेळेवर पोहचण्याची शक्यता आहे.