मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप मोठा पक्ष असेलही, मात्र, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केले. भाजपची ज्या राज्यात दहा-दहा वर्षे सत्ता होती, त्या ठिकाणी भाजपाची सत्ता गेली. आता देशातही तशी परिस्थिती येईल, असेही पवार यावेळी म्हणाले.
देशातील विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकवटले आहेत. १४ तारखेला चंद्राबाबू आणि इतर नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीत देशस्तरावर कसे लढायचे हे ठरविणार आहोत. मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिथे उभे आहेत, त्या ठिकाणी प्रचार करणार असल्याचेही पवार म्हणाले.
राज्यातील आघाडीच्या जागावाटपासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काम करत आहोत. राज्यात आम्हाला शेकाप मदत करत आहे. पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडेही आम्हाला सहकार्य करत आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही पक्ष आणि इतर सर्व एकत्रित काम करत आहोत. माझी नुकतीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासोबत बोलणे झाले असून त्यांना आम्ही एक जागा द्यायचे ठरवले आहे. आम्ही कधीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोललो नाही, शिवाय आम्हाला त्यांच्याशी बोलावसंही वाटलं नाही. त्यांच्यात शक्ती असेल तर त्यांनी वेगळे लढावे, असेही ते प्रकाश आंबेडकरांसंदर्भातील आघाडीबाबत बोलताना म्हणाले. राज्यात आता आघाडीचे काम जोरात सुरू असल्याचेही पवार म्हणाले.
मोदींनी आपला हट्ट करून देशात नोटाबंदी केली, हा निर्णय चुकीचा होता. यासाठी रिझर्व बँकेचे आजच स्टेटमेंट आले असून त्यात मोदी उघडे पडले आहेत. नोटाबंदीनंतर एक तर लहान उद्योग आणि नोकऱ्या गेल्या त्यामुळे भाजपला येत्या निवडणुकीत यासर्वाची किंमत मोजावी लागेल, असेही पवार यावेळी म्हणाले. मोदी हे राजकीय निर्णयाचा विषय आल्यास कोणाचा सल्ला घेत नाहीत ते आपली ५६ इंच छाती दाखवत असतात. मात्र मोदी हे आताच्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान होतील असे मला वाटत नाही. भाजप मोठा पक्ष होईल, मात्र भाजपला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.