मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस केली आहे. रश्मी ठाकरे यांना कोरोना झाला आहे. सध्या HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोदींनी रश्मी ठाकरेंच्या तब्बेतीची विचारपूस केली आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सुभेच्छा दिल्या आहेत.
लस घेतल्यानंतर झाला कोरोना
रश्मी ठाकरे यांना 23 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाइन करुन घेतलं होतं. त्यानंतर रश्मी ठाकरेंना HN रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
आदित्य ठाकरेंनाही कोरोना
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य यांनी स्वत: 20 मार्च रोजी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर आदित्य यांच्या आई रश्मी ठाकरेंना कोरोना झाला.
मोदींच्या फोनमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रश्मी ठाकरेंना केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 2019ची विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेने एकत्र लढली. मात्र, निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला धक्का दिला. राष्ट्रवाद आणि काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेना सत्तेत आली. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजप-शिवसेना सतत आमने-सामने येताना दिसत आहेत. एकमेकांवर हल्लोबोल करण्याची एकही संधी हे पक्ष सोडत नाहीत. भाजप तर ठाकरे सरकारची कोंडी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसत आहे. असे असतानाही मोदींनी रश्मी ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
शरद पवारांचीही मोदींकडून विचारपूस
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पित्ताशयाचा त्रासामुळे पोटात दुखू लागले. त्यामुळे मंगळवारी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी रात्री रुग्णालयात त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात हजेरी लावली. तर काही नेते मंडळी मंडळींनी फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हेही वाचा - केंद्राकडून अल्पबचत योजनांमध्ये व्याजदरात 1.1 टक्क्यांपर्यंत कपात; जाणून घ्या सविस्तर माहिती
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण : गुन्ह्यातल्या गाड्यांचं कनेक्शन मुंबई पोलीस आयुक्तालयाशी