मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटला. परीक्षा केंद्रांवर गोंधळ, निकाल दिरंगाई अशा बातम्यांची महाराष्ट्राला सवय झाली. पण आजचे एमपीएससी डेटा लिक प्रकरण धक्कादायक आहे. अवघ्या सात दिवसांवर आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र, आयोगाकडे असलेली विद्यार्थ्यांची सर्व माहिती तसेच प्रश्नपत्रिका आपल्याकडे असल्याचा दावा कुणी समाजमाध्यमांवर करत असेल, तर हे खूपच गंभीर प्रकरण आहे. उच्चस्तरीय समिती नेमून या प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हायला हवी. तसेच, आयोगाने नवीन प्रश्नपत्रिका काढून ही परीक्षा घ्यायला हवी, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन : अमित ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे की, 'डेटा खूप मौल्यवान आहे' हे ओळखून यापुढे एमपीएससीची वेबसाईट हॅकर्सकडून हॅक होणार नाही किंवा डेटा लीक होणार नाही, यासाठी आयोगाने एथिकल हॅकर्स आणि आयटी-डेटा एक्सपर्ट्सच्या सहकार्याने सर्वतोपरी तांत्रिक दक्षता घ्यायला हवी आणि आपली विश्वासार्हता जपायला हवी. अन्यथा, विद्यार्थ्यांना वारंवार धक्के देणाऱ्या गलथान कारभारामुळे या आयोगाची 'महाराष्ट्र पब्लिक शॉकिंग कमिशन' हीच ओळख सर्वांच्या मनात कायम होईल.
विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलन केले : दरम्यान, मागील काही वर्ष आपल्या भोंगळ कारभारामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यातील विद्यार्थ्यांनी अनेक वेळा आंदोलन देखील केली आहेत. आता तीस तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सेल्स टॅक्स आणि पीएसआय यासह विविध 40 जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र, त्याआधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट इंटरनेटवर लिक करण्यात आल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुन्हा एकदा टीकेचा धनी झाला आहे.