मुंबई : राज्यात आज (21 एप्रिल) रात्रीपासून कडक लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. आतापर्यंत ही लॉकडाऊनची रिहर्सल होती का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.
गेले काही दिवस कोरोना रुग्ण वाढीसाठी फक्त जनतेला एकतर्फी दोष देण्याची स्पर्धाच लागली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रुग्ण वाढत असताना केवळ जनतेला दोष दिला जात आहे. तर मंत्र्यांनी लक्षात ठेवावं की एक बोट जनतेकडे दाखवत असताना आपल्याकडे तीन बोटं आहेत. या मंत्र्यांनी बैठकीत काय केलं? पालिकेत 7 आयुक्त बसवले आहेत. हे आयुक्त काय करत आहेत. आतापर्यंत नियोजन का झाले नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
एका वर्षात पर्याप्त आरोग्य व्यवस्था उभी न करणं हे सरकारचेच अपयश आहे. जेव्हा सरकारमधील मंत्री एक बोट जनतेकडे दाखवतात, तेव्हा तीन बोटं त्यांच्याकडे आहेत हेसुद्धा त्यांनी विसरून चालणार नाही, असे ट्विट देशपांडे यांनी केले.
राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा आहे. त्यावरून संदीप देशपांडे यांनी हा सवाल केला आहे.