मुंबई - महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्याच्या ठरावास गुरुवारी विधानसभेत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे.
या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधानसभा सभागृहात मांडण्यात आला होता. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रात २ हजार चौ.कि.मीची वाढ होणार आहे. लोकप्रतिनिधिंच्या मागणीने एमएमआरडीए क्षेत्रात वाढ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बृहन्मुंबई व सभोवतालच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची वाढ आणि त्या अनुषंगाने विकसनशील क्षेत्राचे सुयोग्य नियोजन व नियोजित विकास व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. १९६७ साली अधिसूचित झालेल्या मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ९६५ चौरस किलोमीटर होते. त्यानंतर त्याची हद्द वाढवून ते ४ हजार ३५५ चौरस किलोमीटर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता.
मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे ही हद्द वाढविण्याची मागणी होत होती. या प्रकल्पांमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-सुरत शीघ्रगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालघर जिल्हा व उद्योग केंद्र, मुंबई पोरबंदर प्रकल्प, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, विविध मेट्रो प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या निर्णयामुळे एमएमआरडीएच्या एकूण क्षेत्रात २ हजार चौ.किमी इतकी वाढ होणार आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि मनिषा पाटील, किसन कथोरे, नसीम खान, सुरेश लाड यांनी सहभाग घेतला.