मुंबई - उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज झाला आहे. यामध्ये एकूण ३६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या ३६ मंत्र्यांमध्ये काही असेही मंत्री आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, राजेंद्र पाटील यड्रावरकर आणि प्राजक्त तनपुरे यांचा यामध्ये समावेश आहे.
आदित्य ठाकरे - ठाकरे कुटुंबातील पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे आणि वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. वडील मुख्यमंत्री असताना मुलाने कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणे, हा योग महाराष्ट्रात पहिल्यांदाच आला आहे.
अदिती तटकरे - खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या अदिती तटकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली. त्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आहेत. अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषविले आहे. त्याआधी त्यांनी युवती काँग्रेस कोकण विभाग अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
राजेंद्र पाटील यड्रावरकर - राजेंद्र पाटील यड्रावरकर हे शिरोळ मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. निवडून आल्यानंतर त्यांना शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. शरद पवार हे आमदार यड्रावरकरांचे नेते आहेत. मात्र, त्यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर चर्चांना उधाण आले होते.
प्राजक्त तनपुरे- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार प्राजक्त तनपुरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तनपुरेंची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. तनपुरेंना कोणते खाते देण्यात येईल, हे खातेवाटपानंतरच समोर येईल.