मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील आतंरवाली सराटी इथं आमरण उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. दरम्यान दोन दिवसांपासून मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मंगळवारी मंत्रालयासमोर काही मराठा आमदारांनी आंदोलन केल्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार गट व ठाकरे गटातील आमदारांनी मंत्रालयसमोर आंदोलन करत आहेत.
मंगळवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दीड तास चर्चा झाली. यानंतर आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. मात्र त्याआधीच मंत्रालयसमोर अजित पवार गट व ठाकरे गटातील आमदार आक्रमक होत आंदोलन करत आहेत. मंत्रालयाच्या गेटला टाळं ठोकलं आहे. निलेश लंके, चेतन तुपे, अमोल मिटकरी आदी आमदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
तातडीनं विशेष अधिवेशन बोलवा : मराठा आरक्षणासाठी अजित पवार गटातील निलेश लंके, कैलास पाटील राहुल पाटील आणि राजू नवघरे यांनी मंगळवारी उपोषण केलं होतं. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आमच्या हक्काचं..., नाही कुणाच्या बापाचं..., अशा घोषणा दिल्या होत्या. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा, आणि मराठा आरणक्षाचा प्रश्न मार्गी लावा, अशी मागणी या तीन आमदारांनी केली होती. यानंतर आज पुन्हा एकदा ठाकरे गट व अजितदादा गटातील आमदारांनी एकत्ररित्या मंत्रालयसमोर आंदोलन केलं आहे. यावेळी त्यांनी मोठ-मोठ्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी त्यांनी विशेष अधिवशेन बोलवण्याची मागणी केली.
- या आमदारांनी केलं आंदोलन- राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजाणी दुर्रानी, मोहन उबर्डे, शेखर निकम आणि राजेश पाटील या आमदारांनी आंदोलनात सहभाग घेतला.
मंत्रालयाला ठोकले टाळे : मराठा आरक्षणासाठी अजित पवार गट व ठाकरे गटातील आमदार आक्रमक झालेत. या आमदारांनी मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या गेटला टाळं ठोकलं आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात कामकाज होऊ देणार नाही, असा पवित्रा या आमदारांनी घेतला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मंत्रालय शेजारील महात्मा गांधी पुतळ्याजवळ या आमदारांचे उपोषण सुरु आहे.
- मंत्रालयाच्या मुख्य गेटवर आंदोलन करणाऱ्या आमदारांना पोलिसांनी घेतलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आमदारांनी लावलेले कुलूप उघडले आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या दहशतीनं मंत्रालयात जाणारे सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. सर्व आमदारांना आझाद मैदान पोलीस स्थानकात नेल्याची माहिती आहे.
हेही वाचा :