मुंबई - कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) केली.
आमदार पाटील म्हणाले, न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रीपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण, अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपाची मागणी कायम आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. पण, मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात. राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.
वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रीपदापासून दूर राहणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
हेही वाचा - मुंबई लोकलसेवा : सत्ताधारी अन विरोधकांमध्ये शह-काटशहचे राजकारण