मुंबई - विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रज्ञा सातव (congress mla pradnya satav) या बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज (सोमवारी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना प्रमाणपत्र दिले. मागील पाच दिवसांपासून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून काँग्रेसकडून प्रयत्न केले जात होते व अखेर त्या प्रयत्नांना यश आले. (MLA certificate has been issued to congress mla pradnya satav)

भाजपने अर्ज मागे घेतल्याने त्यांचे आभार -
काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांची विधान परिषद पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता. भाजप उमेदवार संजय कणेकर यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष तसेच विरोधी पक्ष भाजपचे आभार मानले.
हेही वाचा - CM Thackeray Spine surgery मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी
परंपरेनुसार विजय -
एखाद्या सक्रिय आमदाराचे किंवा खासदाराचे निधन झाल्यानंतर त्या जागेवर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होत असल्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. या परंपरेनुसार काँग्रेसकडून भाजपला विनंती करण्यात आली होती व भाजपने ती विनंती मान्य केल्याने प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना प्रमाणपत्र दिले. याप्रसंगी विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनी विजयी उमेदवार प्रज्ञा सातव यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.