मुंबई - कुलाब्यातील सुंदर नगरी, आजाद नगरी आणि गीतानगर परिसरातील नागरिकांना इतरत्र हलवण्याचे षडयंत्र भाजप-सेना सरकार करत असल्याचा आरोप आमदार भाई जगताप यांनी केला. कुलाब्यातील गोरगरिबांची एकही वस्ती हलवू देणार नसल्याचेही जगताप म्हणाले. स्वातंत्र्यापूर्वी वसलेल्या या वस्त्या नौदलाच्या सुरक्षेसाठी अडचणीच्या ठरत असल्याचे सांगत, त्या इतरत्र हलविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आमदार राज पुरोहित यांनी पत्र लिहून स्थानिकांना खोटे आश्वासन दिले होते. परंतू, निवडणुका संपताच नौदलाकडून येथील झोपडपट्ट्यांच्या नागरिकांना नोटिस बजावण्यात येत आहेत. त्यामुळे जी अवस्था बीपीटी येथील झोपडपट्टीवासीयांची झाली तीच येथील नागरिकांची केली जाईल, अशी भीती वाटत असल्याचे जगताप म्हणाले.
या परिसरात स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून मांगेला, आगरी, कोळी, बंजारा आदी समाजाच्या वस्ती असून त्यांच्याकडे सर्व प्रकारचे रहिवासाचे पुरावे आहेत. त्यामुळे त्यांचे स्थलांतर होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही जगताप यांनी दिला.
या परिसरातील नागरिकांनीही यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत आम्ही येथील जागा सोडणार नाही. आम्ही इथेच मरू, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. सुंदर नगरी, आझाद नगरी परिसरात खासगी संस्थांकडून सर्वे करून प्रत्येकांच्या घरावर नोंदी करण्यात आल्या आहेत. घरांच्या भिंतीवर त्यासाठीचे क्रमांक देण्यात आलेले आहेत. मात्र, हे सर्व कशासाठी केले जात आहे. यासाठीची माहिती आम्हाला दिली नसल्याचे सुंदर नगरी रहिवासी संघाचे पदाधिकारी आनंद पाटणे यांनी सांगितले.