मुंबई - मुंबई महापालिका किंवा राज्य सरकार पावसाची जबाबदारीही बहुतेक केंद्र सरकारवर ढकलतील आणि म्हणतील मोदींनी यातून मार्ग काढावा, अशी मिश्किल टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर ही लस राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत कशी पोहोचेल यासंदर्भात आज (दि. 9 जून) भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष, मराहाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर यांच्या उपस्थित इतर भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर मुंबईतील नालेसफाई आणि पावसाच्या नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
महापालिकेने मुंबईची तुंबई करुन दाखवली
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईची तुंबई झाल्याने सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेने मुंबईची तुंबई करुन दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. ते आज उघड झाल आहे, असे भातखळकर म्हणाले.
रेल्वे सेवा ठप्प
दरम्यान, आज (दि. 9 जून) सकाळपासूनच पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावत मुंबईची दाणादाण उडवून दिली. मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले त्यामुळे सायन, चेंबूर,अंधेरी, कुर्ला, गोरेगाव, वरळीसह मुंबईतील विविध भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली होती. सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने कुर्ला आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 9 वाजून 50 मिनिटांनी अप मार्गावरील रेल्वे सेवा थांबवण्यात आली. रेल्वे रुळावरील पाणी ओसरल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, असे रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकल सेवा ठप्प झाल्याने चाकरमानी चांगलेच वैतागले आहेत.
हेही वाचा - Mumbai Rains ...तर मुंबईत महाप्रलय येईल, कोस्टल रोडवरून पर्यावरणप्रेमींचा इशारा