मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आज परिवहन मंत्र्यांनी जी घोषणा केली ती वरातीमागून घोडं आहे. ही कोकणातील चाकरमान्यांची फसवणूक आहे, अशी टीका भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली आहे.
कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आशिष शेलारांनी आज सकाळी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती. मात्र, शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. दरम्यान, ग्रामपंचायतींनी 14 दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या तीन दिवसांपासून चाकरमानी कोकणाकडे जाण्यासाठी धडपड करत आहे. एक तर ई पास मिळत नव्हते आणि ज्यांना पास मिळाले त्यांच्या वाहनांच्या रांगा कशेटी घाट आणि खारेपाटणमध्ये लागल्या होत्या. त्याठिकाणी अन्न, पाण्याविना चाकरमान्यांचे हाल सुरू आहेत, असे शेलार यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी परिवहन मंडळाच्या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आजपासून बुकिंगही सुरू केले आहे. मात्र, आजपासून एसटीचे बुकिंग सुरू होणार असेल तर मग प्रवास कधी होणार? 10 दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी ग्रामपंचायती 14 दिवस क्वारंटाइन करणार आहे. त्याविषयी शासनाच्या प्रतिनिधींनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली आहे का? रेल्वे विभाग गाड्या सोडण्यास तयार होता, तर मग शासनाने गाड्या का मागितल्या नाहीत? जे एसटीने जाणार आहेत त्यांना ई पासची गरज नाही. मग खासगी गाडीसाठी का पास हवा? एकाचवेळी एसटी आणि खासगी गाड्या रस्त्यावर आल्यास वाहतूक नियोजनाचे काय? केवळ 250 रुपयात अँटीबॉडी टेस्ट होत असताना चाकरमान्यांच्या या टेस्ट शासनाने मोफत का केल्या नाही?, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोकणातील चाकरमान्यांची शासनाला कोंडीच करायची होती. म्हणून आता फक्त दाखवण्यासाठी घोषणा करत वरातीमागून घोडा आणल्यासारखा निर्णय घेतला आहे, अशा शब्दात आमदार आशिष शेलार यांनी टीका केली.