मुंबई - राज्याचे पर्यावरणमंत्री व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आज (दि. 30 सप्टें.) मंत्रालयात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आझमी यांनी जोरदार निदर्शने केली. आदित्य ठाकरे होश मे आवो, एसएमएस कंपनी बंद करो, आदी घोषणा मंत्रालयात देण्यात आल्या. महाविकास आघाडीतील एक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडून सरकारच्या एका मंत्र्याविरोधातच घोषणाबाजी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, देवनार परिसरात असलेल्या क्षेपणभूमीतील (डम्पिंग ग्राउंड) प्रदूषणाचा फैलाव करत असलेल्या एसएमएस कंपनीला तत्काळ बंद करावे, अन्यथा या विरोधात जोरदार आंदोलन करणार, असा इशारा आमदार आझमी यांनी यावेळी दिला.
आझमी म्हणाले, मानखुर्द, गोवंडी,शिवाजीनगर परिसरात प्रदूषणामुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात आले आहे. याबद्दल मागील दहा वर्षांपासून मी सरकारकडे पाठपुरावा करत आहे. पण, माझे कोणी ऐकत नाही. आज येथील लोकांचे जीवनमान हे केवळ पन्नास वर्षांच्या आत आले असून अनेकांना क्षयरोग व विविध आजारांनी ग्रासले आहेत. त्यामुळे सरकारने आता याविषयी आमच्या ऐकले नाही तर, यापुढे सरकार विरोधातच माझे आंदोलन जोरात असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
देवनार येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर एसएमएस नावाची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून आसपासच्या परिसरात अत्यंत घातक वायू सोडले जातात. यामुळे येथील लोकांचे जीवन धोक्यात सापडले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
अजित पवार व त्यांचे पीए फोनच उचलत नाहीत
आमदार आझमी म्हणाले, एसएमएस कंपनीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते फोन उचलत नाही. तसेच त्यांचे स्वीय सहाय्यकही फोन उचलत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्यासोबत असलेल्या व्यक्तींसोबत, अशी वागणूक योग्य नाही. ते स्वतः कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी सर्व खबरदारी घेत आहे. पण, राज्यातील जनतेवर वाऱ्यावर सोडण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असल्याचा आरोपही यावेळी आझमी यांनी अजित पवारांवर केला.
हेही वाचा -'बाबरीचा विद्ध्वंस झाला नसता तर, राम मंदिर बघायला मिळाले नसते'