मुंबई : बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून ट्युशनला जाते सांगून घराबाहेर पडली. ती घरी न परतल्याने तिच्या आई-वडिलांनी एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना काल (रविवारी) घडली असून रात्री मिसिंगची तक्रार दिली. त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान 363 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवण्यात आली.
पोलीस पथक लागले कामाला : हा गुन्हा नोंद झाल्यानंतर एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एमएचबी पोलीस ठाण्याचे पर्यवेक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक टिळक, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार आणि पथक तसेच रात्रपाळी स्टाफ, अधिकारी, रात्रपाळी निर्भया अधिकारी आणि पथक हे हरवलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तात्काळ कामाला लागले. त्यांनी या मुलीचा कसून शोध सुरू केला. त्यामुळे ही मुलगी लवकर सापडण्यास मदत झाली.
अशाप्रकारे केला तपास : मुलगी हरवली आहे की, तिचे अपहरण झाले हे पालकांना कळायला मार्ग नव्हता. तसेच पोलिसांना शोध घेणे देखील अवघड होते. कारण हरवलेल्या बारा वर्षे मुलीकडे मोबाईल नव्हता. त्यामुळे तपासात अनेक अडथळे निर्माण झाले होते. परंतु, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे सीसीटीव्ही तपासून हरवलेल्या मुलीचा माग घेतला असता ती बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची शक्यता पोलिसांना वाटली. एम एच बी कॉलनी पोलीस ठाण्याचे पथक बोरिवली रेल्वेस्टेशन येथे गेले असता हरवलेली अल्पवयीन मुलगी ही बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या परिसरात आढळून आली. हरवलेल्या मुलीला एमएचबी पोलीस ठाण्यात आणून तिच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला आहे की नाही याची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर खात्री पडल्यावर तिची वैद्यकीय तपासणी करून तिची तिच्या आई-वडिलांकडे सुखरूप रवानगी करण्यात आली, अशी माहिती एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली. कुडाळकर यांनी सांगितले की, ट्युशनला गेली नाही किंवा अभ्यास केला नाही म्हणून अल्पवयीन मुलगी ट्युशनला न जाता इतरत्र गेली असण्याची शक्यता होती. अखेर पोलिसांचा अंदाज खरा ठरला.
हेही वाचा : Caste verification case : नवनीत राणा यांचे वडिल फरार?