मीरा भाईंदर - मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे गूगल सर्च करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Mira Bhayander Vasai Virar Police Commissioner). तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नागरिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने करतात त्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे. (Police Commissioner warned about cyber crime).
सायबर चोर घेतात फायदा - सध्या विविध ॲप व वेबसाईटचा वापर नागरिक करत आहेत. सर्व सोशल प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या डिस्काउंट स्कीम, तात्काळ सेवा सुविधा ग्राहकांना वितरित केल्या जातात. या सुविधा घेत असताना पेमेंट करिता वेगवेगळ्या कंपन्यांचे ॲप असून ते सुरक्षित मानले जातात. याचाच फायदा फसवणूक करणारे घेतात व सायबर चोर गुगलवर खोटे हॉटेल किंवा आस्थापनाचे नाव टाकून त्यांच्यासमोर त्यांचा मोबाईल नंबर नमूद करतात. नागरिकांनी गुगल सर्च केल्यास फसवणूक करणाऱ्यांचा फोन क्रमांक दिसून येतो व हॉटेल बुकिंग चार्जेस, फ्लाईट बुकिंग चार्जेस, करन्सी एक्सचेंज, राहणे-खाने व इतर सुविधा देण्याचे सांगत पैसे उकळले जातात. पैसे मिळतात नंबर बंद करण्यात येतात अथवा सायबर चोरांकडून लिंक पाठवली जाते. त्यामध्ये बँक खात्याचा तपशील भरल्यास एप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगून कोड मागितला जातो व पैसे बँकेतून काढत फसवणूक केली जाते.
या सावधानता बाळगा - या सर्व फसवणुकी पासून वाचण्यासाठी गुगलचा वापर करून कोणतीही ऑनलाइन बुकिंग करताना संकेतस्थळावरील क्रमांक तपासा. खात्री झाल्या शिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. कोणत्याही अज्ञात लिंक किंवा स्कॅनर वर क्लिक करू नका. मोबाईलचा ताबा घेईल असे स्क्रीन एप्लीकेशन डाउनलोड करू नये. हॉटेल बुकिंग करताना अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. ओटीपी कोणालाही देऊ नये, अश्या प्रकारची सावधानता बाळगण्याचे आवाहन मीरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडून करण्यात आले आहे.