मुंबई - राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आम्ही साथ रोग प्रतिबंधक कायद्याच्या आधारे घेतला. यासाठी आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नव्हते. परंतु, राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेतली तर या परीक्षा रद्द व्हाव्यात अशीच आमची ठाम भूमिका असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कोणतेही राजकारण त्यामागे नव्हते. परंतु काल विद्यापीठ अनुदान आयोगाने या परीक्षा संदर्भात दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना ह्या विद्यार्थी हिताला बाधक ठरतील, त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असे आमचे मत आहे. म्हणूनच आम्ही या मार्गदर्शक सूचना मध्ये बदल करावा, अशी मागणी करणारे पत्र यूजीसीला पाठवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; उदय सामंतांचे केंद्राला पत्र
काल केंद्रीय गृह विभागाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात परवानगी दिली आणि त्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांना पत्र लिहून या परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे सांगितले. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात केंद्राच्या या निर्णयाविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आपण यूजीसीला नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करावा, यासाठी विनंती करणारे पत्र लिहिले असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.
राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घेतल्या जाणार, यासाठी काय उपाययोजना करावी लागेल आणि त्यासाठी फिजिकल डिस्टन्स कसा पाळणार, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे माझ्या पाठवलेल्या पत्राची तातडीने दखल घ्यावी, यासाठी मी प्रयत्न करत असल्याची माहितीही सामंत यांनी दिली.