मुंबई -दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या नावाखाली इतर उपयोगासाठी वापरले जाणारे आरेचे स्टॉल राज्य सरकारच्या रडारवर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्व स्टॉलचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी प्रशासनाला दिले. यामुळे बेकायदेशीररित्या स्टॉल वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा - रुग्ण वाढ सुरुच; बुधवारी राज्यात 8807 नवीन कोरोनाबाधित, 80 मृत्यू
कारवाईची मोहीम
मुंबईत आरे दूध विक्रीचे मोक्याच्या ठिकाणी सुमारे १ हजार ६०० स्टॉल असून त्यांचा दुरुपयोग होतो. आरेचे दूध या स्टॉलच्या माध्यमातून विकले जात नाही, ही बाब निदर्शनास आल्याने मुंबईत आरेचे दूध न विकणाऱ्या आरे स्टॉलधारकांविरुद्ध कडक कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. याबाबत मंत्रालयात आरे स्टॉलसंदर्भात आढावा घेण्यात आला.
स्टॉलचे सर्व्हेक्षण होणार
पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी, मुंबईत आरे स्टॉलवरून सद्यस्थितीत आरे उत्पादनाची होणारी स्टाॅलनिहाय एकूण विक्री, दुग्धजन्य पदार्थ सोडून इतर पदार्थांची विक्री व त्याबाबतची माहिती, एकूण आरे स्टाॅलची संख्या, सध्या प्रत्यक्ष चालत असणारे व अवैधरित्या हस्तांतर करून चालविणाऱ्या आरे स्टॉलची संख्या, अशी माहिती मिळवण्यासाठी तात्काळ सर्व्हेक्षण करावे, असे निर्देश दिले आहेत.
आढावा बैठकीला पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त एच.पी. तुम्मोड उपस्थित होते.
हेही वाचा - कर्नाटक सीमेवर तपासणी तर मध्यप्रदेश सीमेवर कोरोनाचे नियम पायदळी; पाहा रियालिटी चेक