मुंबई - राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळाची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी चर्चा झाली. तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागात जाण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे आज सोलापूर, सातारा, सांगली दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
महादेव जानकर हे शनिवार (दि. ४) रोजी सकाळी ८ वाजता सांगोला (जि. सोलापूर) मधील शिवणे, यलमार, मांगेवाडी, गौडवाडी, बुरंगेवाडी, गावडेवाडी, घेरडी आदी गावांना भेटी देणार आहेत. त्यानंतर जत (जि सांगली) मधील वायफळ, अचकनहळ्ळी, माडग्याल, कुलाळवाडी, अंकलगी, दरीबडची, मुचंडी आदी गावांची पाहणी करणार आहेत.
रविवार (दि 5) रोजी सकाळी ८ वाजता माण (जि सातारा) मधील मार्डी, म्हसवड, गोंडावले बुद्रुक, दहिवडी, मोगराळे या गावांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी करणार आहेत.
राज्यात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. राज्यातील लोकसभेच्या निवडणुका संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. तसेच दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी मंत्रीमंडळाची बैठकही घेतली आहे. दुष्काळी भागात पशूंना चारा आणि पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकार दुष्काळी उपाय योजना करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले आहे.