जळगाव - राज्य सरकार कोरोनासारख्या महामारीशी लढा देत असताना विरोधक घाणेरडे राजकारण करत आहेत. हे सरकार पाडणार असल्याच्या वावड्या काल-परवापासून उठवल्या जात आहेत. पण हे सरकार स्थिर आहे. कोरोनाचे संकट गेल्यावर मैदानात या, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हान पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिले आहे. गुलाबराव पाटील बुधवारी दुपारी जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आले होते. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी ते पत्रकारांशी बोलत होते.
महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याची चर्चा विरोधकांकडून काल-परवापासून रंगवली जात आहे. कोरोनासारख्या कठीण काळात अशी चर्चा रंगवणे म्हणजे, जबाबदारीने आपले काम करणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करत आहेत. कोरोनाच्या काळात कोण काय करत आहे? हे जनता जाणून आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी मध्य प्रदेशात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण केले गेले, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात वातावरणनिर्मिती सुरू आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाला जनतेने स्वीकारले आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार हे जनतेच्या मनात पक्के बसलेले आहेत. त्यामुळे सरकार पाडण्याचा विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न आहे. कोरोनासारख्या संकटात विरोधकांनी हा घाण प्रयत्न केला आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे स्थिर असून ते आपला कार्यकाळ यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्ता गेल्याने विरोधकांची तडफड सुरू आहे -
कोरोनाशी लढा देण्यासाठी राज्य सरकार शक्य ते प्रयत्न करत आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर होणारा अकार्यक्षमतेचा आरोप चुकीचा आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्यापेक्षा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा. एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तडफडतो, त्याच पद्धतीने विरोधक सत्ता गेल्यामुळे तडफडत आहेत, अशी टीकाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली.