मुंबई - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत जयंती महोत्सव आयोजित न करता उद्या 1 ऑगस्ट रोजी साजरी होणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची शंभरावी जयंती घरच्या घरीच त्यांना अभिवादन करून साजरी करावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
धनंजय मुंडे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती जाग्या करत, २०२० हे वर्ष आपण लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहोत, यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे व खास जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्याचे राज्य शासनाने ठरवले होते.
परंतु, जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने या संकल्पावर बंधन घातले आहे. हे बंधन शरीराला असू शकतं, पण मनाला नाही! अण्णा भाऊ साठे यांचे विचार त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून अजरामर झालेले आहेत. त्यामुळे यंदाची जन्मशताब्दी विशेष जयंती आपण घराघरात आणि मनामनात साजरी करूयात, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.
आपण सर्व जण लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचे अनुयायी म्हणून आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षीची जयंती घरच्या घरीच अण्णाभाउंच्या प्रतिमेस अभिवादन करून साजरी करू. कुठेही कोरोनाविषयक नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन आपण सर्वांनी अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतींना उजाळा द्यावा, त्यांना अभिवादन करावे असे मुंडे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीच्या पूर्व संध्येला केलेल्या आवाहनात म्हटले आहे.