मुंबई Deepak Kesarkar Met Prakash Ambedkar : शनिवारी वंचित बहुजन आघाडीनं मुंबईतील शिवाजी पार्कवर संविधान सन्मान रॅली घेतली. या रॅलीला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या रॅलीतून केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र डागलं. यानंतर आज राजकीय क्षेत्रातून २६/११ दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन करण्यात येत असताना, आज मंत्री दीपक केसरकर यांनी अचानक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय, तर विविध तर्कवितर्क काढले जाताहेत.
कोणत्या कारणासाठी भेट? : आज मंत्री दीपक केसरकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह या निवासस्थानी भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, आज देशभरात संविधान दिन साजरा केला जात आहे. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना भेटून संविधान दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईचा पालकमंत्री या नात्यानं मी सतत त्यांच्या संपर्कात असतो. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मात्र कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मंत्री दीपक केसरकर यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क काढले जाताहेत.
प्रकाश आंबेडकर यांचे विचार महत्वाचे : या भेटीनंतर राजकीय हालचालीचे संकेत आहेत की, केवळ सदिच्छा भेट होती? अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपण्याकरिता आम्हा दोघांमध्ये समन्वय आहे. तसेच महाराष्ट्रातील विचारवंतांमध्ये प्रकाश आंबेडकर यांचे विचार महत्वाचे आहेत. त्यांचं वक्तव्य महत्त्वाच मानलं जातं. त्यामुळं मी त्यांच्या संपर्कात असतो. तसंच कुठत्याही कारणासाठी महाराष्ट्र अस्वस्थ होता कामा नये, महाराष्ट्र शांत राहिला नाही तर गुंतवणूकदार राज्यात येणार नाहीत, असं दीपक केसरकर हिंगोलीत छगन भुजबळ यांचा ताफा अडवल्यानंतर म्हणाले.
हेही वाचा -