मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन संजय निरुपम यांना हटवण्यात आले असून त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संजय निरुपम यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
निरुपम यांच्याविेरोधात मुंबईतील अनेक काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी पक्षश्रेष्ठीकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीच्या या कालावधीत त्यांच्याकडून मुंबई प्रदेशाध्यक्ष हे पद काढून घेतले जाईल याविषयी पक्षातील अनेक दिग्गजांनाही कल्पना नव्हती. निरुपम यांना हटवून माजी खासदार मिलिंद देवरा यांना मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसने निवड केली आहे.
काँग्रेसने एकाच वेळी उमेदवारी देवून दुसरीकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी काढल्याने निरुपम यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे संजय निरुपम यांनी पक्षाकडे उत्तर मुंबईतून उमेदवारी मागत असताना पक्षाने मात्र ती न देता त्यांना उत्तर पश्चिम या लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिल्याने त्याविषयी निरुपम यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरच सायंकाळी पक्षश्रेष्ठींनी निरुपम यांच्याकडून मुंबई प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतल्याने याविषयी उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात निरुपम हे लवकर माध्यमांशी बोलणार असून त्यात ते काय भूमिका मांडतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.