मुंबई - राज्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत राज्यातील 4 लाख 24 हजार 333 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यश आले आहे. सरकारचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, वायूदल, तटरक्षक दलाचे जवान कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमच्या 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे (जि. कोल्हापूर) रवाना होत असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे 23 तसेच नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके, सैन्यदलाची 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची सांगलीमध्ये 2 तर कोल्हापुरात 1 अशी तीन पथके कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमचे 15 नौदलाचे पथक बोटींसह शिरोळमध्ये (जि. कोल्हापूर) पोहोचले आहे.
आतापर्यंत कोल्हापूर येथील 2 लाख 33 हजार 150 तर सांगली येथील 1 लाख 44 हजार 987 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 74 बोटींद्वारे तर सांगली जिल्ह्यात 93 बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे.
बाधित गावे व कुटुंबे
कोल्हापूर जिल्ह्यात पूरबाधित गावे - 249, बाधित कुटुंबे - 48 हजार 588 तर सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे - 108 व कुटुंबसंख्या - 28 हजार 537 अशी आहे. या सर्व गावात प्रशासनाच्या पथकांबरोबर इतर सर्व आपत्ती निवारण दलांचे बचाव कार्य सुरू आहे.
पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी तत्काळ संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून वेळोवेळी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाबरोबर मदतीसंदर्भात संपर्कात आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राज्यातील इतर बाधित गावे -
सातारा - 118 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 9221), ठाणे - 25 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 13104), पुणे - 108 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 13500), नाशिक - 05 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 3894), पालघर - 58 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 2000), रत्नागिरी - 12 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 687), रायगड - 60 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 3000), सिंधुदुर्ग - 18 गावे (बचाव केलेल्या व्यक्ती - 490), असे एकूण कोल्हापूर शहरासह 69 बाधित तालुके तर 761 गावे आहेत. पुरामधे मृतांचा आकडा 19 पर्यंत पोहोचला आहे.