मुंबई - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. चार टप्प्यातील लॉकडाऊन पूर्ण झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने अनलॉक 1.0 जाहीर केले. अनलॉक 1.0 जाहीर केल्यानंतरही मुंबईतील स्थलांतरित मजुरांचे गावी परतणे सुरूच असल्याचे चित्र आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करून उद्योग, व्यवसाय व दुकान सुरू करण्यास मुंबईत परवानगी दिली आहे. तरीही मुंबईतील स्थलांतरित कामगारांचा आपल्या गावाकडे जाण्याचा कल अजूनही असल्याचे पाहायला मिळतेय. आज मुंबईच्या सीएसएमटी स्थानकातून मजूर कोणार्क एक्स्प्रेसने ओडिशा, भुवनेश्वरला रवाना झाले. बहुतांश लोक हे बांधकाम इमारतीवर मजूर म्हणून कामाला होते.
बांधकाम सुरू नसल्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. म्हणून गावी जाण्याचा निर्णय घेतल्याचे मजुरांनी सांगितले. मात्र, मुंबईतील जनजीवन सुरळीत झाल्यास मुंबईत पुन्हा कामाला येणार असल्याचे ते म्हणाले. लॉकडाऊनमुळे राज्यातून श्रमिक रेल्वे आणि एसटी बसेसद्वारे लाखो मजूर त्यांच्या राज्यात परतले आहेत.